मराठी बोर्ड प्रश्नपत्रिका

मराठी बोर्ड प्रश्नपत्रिका

 


1. अ) उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा :

1) कोण ते लिहा :

i) भरपूर दूध देणारी - 

उत्तर :

कपिली गाय


ii) जवळपास साडेपाच फूट उंचीची - 

उत्तर :

माझी आजी


   माझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या - आमच्या - पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच; पण मोत्यासारखे चमकत राहयचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरूणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गोंदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. 

    आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोळ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न् चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची.  


2) खालील वाक्ये चूक की बरोबर ते लिहा :

i) लेखकाची आजी धार काढायला निघायची. -

उत्तर :

चूक 


ii) लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती. -  

उत्तर :

बरोबर


3) स्वमत :

लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दांत करा. 

उत्तर :

आजीला जळवपास साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. विशाल कान व धारदार नाक यांनी आजीच्या सौंदर्यात भर पडत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी तिच्या सौंदर्यात उणेपणा आला नव्हता. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.   


आ) उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा :

1) नावे लिहा :

i) गर्दीनं फुललेलं स्टेशन - 

उत्तर :

लखनऊ स्टेशन


ii) अरुणिमाचे नाव - 

उत्तर :

आंबेडकरनगर

   दोस्तांनो, मी .......... अरुणिमा सिन्हा ! आज तुम्ही गुगलवर शोधले तर 'माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय' असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी ! पण एक सांगू ? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही .............. नव्हते .............. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला .....................

     लखनऊपासून 200 किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांतर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हअ भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. 

11 एप्रिल, 2011 चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली.   



2) कारणे लिहा :

i) अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते, कारण ...................... 

उत्तर :

फार्ममध्ये जन्मतारीख चुकवलेली होती. 


ii) अरुणीमाने 'सीआयएसएफ' मध्ये नोकरीसाठी अर्ज केला, कारण .........................

उत्तर :

खेळीशी जोडलेले नाते राहण्यासाठी नोकरीसाठी अर्ज केला. 


3) स्वमत :

'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. 

उत्तर :

खरे सांगायचे तर कोणीही शिवाजी महाराज बनू शकत नाही, लोकमान्य टिळक बनू शकत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा बनू शकत नाही. त्यांच्याइतकी उंची गाठणे कोणालाही शक्य नही. कारण त्या महान विभूती होत्या. 

मग आपण काहीही करायचे नाही काय ? आपण काहीच करू शकत नाही काय ? खरे तर कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची अशी खासियत असते. एखाद्याला नृत्य आवडते. एखाद्याला गायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला त्यांतील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. त्यात कुणाला मुक्त वाव दिला पाहिजे. मग आपल्या हातून आपो आपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरेतर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वत:मधला वेगळा गुण ओळखला. स्वत:चे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे.         


अपठित गद्य


इ)  1) आकृती पूर्ण करा :

उत्तर :


     सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशांच्याजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणूस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभावच जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे ? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते.  


2) चौकटी पूर्ण करा :

i) सुजनांकडून अपेक्षित असलेले  - 

उत्तर :

सौजन्य


ii) सौजन्यातून व्यक्त होणारे - 

उत्तर :

प्रेम


विभाग - 2 : पद्य

2. अ) कवितेच्या आधारे सुचनेनुसार कृती करा :

1) चौकटी पूर्ण करा :

i) कष्टाने मिळणारे - 

उत्तर :

फळ


ii) घामातून फुलणारे - 

उत्तर :

मोती

 

आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा 

तुजभवती वैभव, माया 

फळ रसाळ मिळते खाया

सुखलोलुप झाली काया

हा कुठवर वेड्या घेसी आसरा

    तुज पंख दिले देवाने

    कर विहार सामर्थ्याने

    दरि-डोंगर, हिरवी राने

    जा ओलांडुनी या सरिता-सागरा

कष्टाविण फळ ना मिळते

तुज कळते परि ना वळते

ह्रदयात व्यथा ही जळते

का जीव बिचारा होई बावरा

    घामातुन मोती फुलते

    श्रमदेव घरी अवतरले

    घर प्रसन्नतेने नटले

    हा योग जीवनी आला साजिरा


2) योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा :

i) सुखलोलुप झाली काया म्हणजे .......................

अ) सुखाचा तिरस्कार वाटतो

आ) सुखाबद्दल प्रेम वाटते

इ) सुखाचे आकर्षण वाटते

ई) सुख उपभोगण्याची सवय लागते

उत्तर :

सुख उपभोगण्याची सवय लागते


ii) पिंजरा सोडून झेप घेतल्याने ..........................

अ) काया सुखलोलुप होते

आ) पाखराला आनंद होतो

इ) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते

ई) आकाशाची प्राप्ती होते

उत्तर :

आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते


3) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :

तुज पंख दिले देवाने

कर विहार सामर्थ्याने 

दरि-डोंगर, हिरवी राने

जा ओलांडुनी या सरिता-सागरा

उत्तर :

हे पाखरा (मनपाखरा) ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखांतील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगर-दऱ्या, हिरवी राने, नद्याव समुद्र सारे (अडथळे) ओलांडून दिशांच्या पार जा. 


4) काव्यसौंदर्य

'आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा' 

या ओळींमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. 

उत्तर :

' आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे. 

प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव , सत्ता, संपत्ती हा लोेकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जिवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळींतून प्रत्ययाला येते.    


आ) खालील मुद्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा :

 मुद्दे 

'आश्वासक चित्र' - किंवा 'वस्तू' 

 

 i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -

 

 

 ii) कवितेचा विषय - 

 

 

 iii) शब्दांचे अर्थ लिहा - 

i) झरोका -

ii) कसब -   

i) स्नेह -

ii) निखालय -

उत्तर :

 मुद्दे 

'आश्वासक चित्र' - किंवा 'वस्तू' 

 

 i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -

 द. मा. धामणस्कर

 

 ii) कवितेचा विषय - 

 निर्जीव वस्तूंचा सजीवपणा 

 

 iii) शब्दांचे अर्थ लिहा - 

i) झरोका - खिडकी

ii) कसब -   कौशलय 

i) स्नेह - प्रेम

ii) निखालय - विरपणा


इ) खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा :

खोद आणखी थोडेसे

खाली असतेच पाणी

धीर सोडू नको, सारी 

खोटी नसतात नाणी. 

उत्तर :

'सकारात्मक (पॉझिटिव्ह) जीवन कसे जगावे व प्रयत्नवादी कसे असावे, हा मोलाचा संदेश देताना कवयित्री म्हणतात -

निराश होऊ नकोस. जमीन खणत राहा. आणखी थोडेसे खोद. जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल. जिद्दीने प्रयत्न कर. जीवन जगताना हिंमत सोडू नको. सर्व माणसे स्वार्थी नसतात. काही प्रामाणिक माणसेही (खरी नाणी) जगात असतात, हा विश्वास मनात असू दे. 

  

विभाग - 3 : स्थूलवाचन


3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :

1) भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. 

उत्तर :

रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे. अलीकडे समाजमाध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलांना/मुलींना फसवतात. अशा प्रकरणांमध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असत . कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीती घालतात, पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात. हे खरे तर आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे. आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील. 


2) गिरिजा कीर यांच्या 'यडबंबू ढब्बू' या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा. 

उत्तर :

'कुणालाही दु:खी ठेवू नये' असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. ढब्बूने तो शिरोधार्य मानला. व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला. पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दश: पाळला. भिकारी म्हणजे माणसेच. त्यांना तरी दु:खी का ठेवावे, असा व्यापक विचार त्याने केला. पण लोक तेव्हा असा व्यापक विचार मांडतात, तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संकुचितच विचार करतात. सर्वाशी प्रेमाने वागावे, असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. फार फार झाले तर सर्व म्हणजे परिसरातील लोक असतात. जात-धर्म यांचा विचार करू नये, असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वत:च्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो. 

 

3) व्युत्पत्तीकोशाचे कार्य स्पष्ट करा. 

उत्तर :

व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश !

व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते :

i) मराठी भाषेतील - प्रमाण व बोली - शब्दांचे मुळ रूप दाखवणे. 

ii) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. 

iii) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. 

iv) भिन्न भिन्न समाजांत वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे. 


विभाग - 4 : भाषाभ्यास


4. अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

1) समास :

योग्य जोड्या जुळवा :

 सामाजिक शब्द

समासाचे नाव  

 i) विटीदांडू 

1) द्विगु  

 ii) निळकमल 

2) समाहार द्वंद्व 

 iii) पंचपाळे

3) इतरेतर द्वंद्व 

 iv) भाजीपाला

4) कर्मधारय 

उत्तर :

 सामाजिक शब्द

समासाचे नाव  

 i) विटीदांडू 

3) इतरेतर द्वंद्व

 ii) निळकमल 

4) कर्मधारय 

 iii) पंचपाळे

1) द्विगु 

 iv) भाजीपाला

2) समाहार द्वंद्व 


2) शब्दासिद्धी

खालील तक्ता पूर्ण करा :

अभिनंदन, हळुहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक

 प्रत्ययघटित 

उपसर्गघटित 

अभ्यस्त 

 

 

 

उत्तर :

 प्रत्ययघटित 

उपसर्गघटित 

अभ्यस्त 

 सामाजिक 

अभिनंदन, उपमुख्याध्यापक 

हळूहळू  


3) खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :

i) कानोसा घेणे

उत्तर :

कानोसा घेणे - अंदाज घेणे

वाक्य : पाऊस पडणार की नाही याचा आमचा मोती कान टवकारून कानोसा घेतो.  


ii) आनंद गगनात न मावणे

उत्तर :

आनंद गगनात न मावणे - खूप आनंद होणे


iii) कंठस्नान घालणे

उत्तर :

कंठस्नान घालणे - ठार मारणे

वाक्य - भारतीय वीर जवानांनी सरहद्दीवर दहशतवाल्यांना कंठस्थान घातले


iv) पित्त खवळणे

उत्तर :

पित्त खवळणे - खूप संतापणे


आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

1) शब्दसंपत्ती

1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :

i) दुसऱ्यावर अवलंबून असलेला - 

उत्तर :

परावलंबी


ii) दररोज प्रसिद्ध होणारे -

उत्तर :

दैनिक


2) खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा :

i) पृथ्वी - 

उत्तर :

अवनी, वसुंधरा


ii) नभ -  

उत्तर :

आकाश

  

3) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :

i) सुरुवात - 

उत्तर :

शेवट


ii) सोय - 

उत्तर :

गैरसोय


4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा :

राखणदार (राखण व दार हे शब्द वगळून)

खण, राख, रण


2) लेखननियमांनुसार लेखन :

अचूक शब्द ओळखा (कोणतेही चार शब्द सोडविणे) :

i) दूर्मीळ/दुर्मिळ/दूर्मिळ/दुर्मीळ

उत्तर :

दुर्मिळ


ii) पीढी/पिढी/पिढि/पीढि

उत्तर :

पिढी


iii) कुटुंब/कुटूंब/कूटूंब/कूटुंब

उत्तर :

कुटुंब 


iv) आशिर्वाद/आर्शीवाद/आशीर्वाद/आर्शिवाद   

उत्तर :

आशीर्वाद


v) उज्ज्वल/उज्वल/ऊज्ज्वल/ऊज्वल

उज्ज्वल


vi) /सामुहिक/सामूहिक/सामूहीक/सामुहीक

उत्तर :

सामुहिक


3) विरामचिन्हे :

खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा :

i) , - 

उत्तर :

स्वल्पविराम


ii) " " - 

उत्तर :

दुहेरी अवतरण चिन्ह


4) पारिभाषिक शब्द :

खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा :

i) Unit - 

उत्तर :

घटक, विभाग


ii) Action - 

उत्तर :

कृती


विभाग - 5 : उपयोजित लेखन

 5. अ) खालील कृती सोडवा :

1) पत्रलेखन 

खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :



1)विनंतीपत्र 

दिनांक : 15 - 3 - 2022 

प्रति,

माननीय आयोजक,

साहित्य सेवा वाचनालय,

साखरवाडी.


विषय: वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबत.

महोदय,

मी विजय देशमुख (आदर्श विद्यालय, साखरवाडी) येथे इ. १० वीमध्ये शिकत असून विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांशी पत्राद्वारे संपर्क साधत आहे. 

आपण 'साहित्य सेवा वाचनालय'तर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करीत असल्याचे समजले. या उपक्रमात आमच्या विदयालयातील पाच विदयार्थी भाग घेऊ इच्छितात. तशी रीतसर परवानगी मुख्याध्यापकांकडून घेण्यात आली आहे. विदयार्थ्याची नावे पुढीलप्रमाणे :

1) अनिकेत पाटील  - इ. 10 वी

2) सचिन देशमुख  - इ. 9 वी

3) प्रदीप जाधव -  इ. 10 वी 

4) मयूर वैद्य  - इ. 9 वी

5) कोमल देशपांडे - इ. 10 वी

उपरोक्त पत्राचा विचार करून आपण या विदयार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची संधी दयावी, अशी नम्र विनंती मी आपणांस करीत आहे.

कळावे,

आपला नम्र,

विनय देशमुख

विद्यार्थी प्रतिनिधी

आदर्श विद्यालय. 

ई-मेल : adarshdeshmukh@xx.com


2 )अभिनंदन पत्र :

दिनांक 21 - 3 - 2022 

प्रिय मैत्रीण प्रचीती.

सप्रेम नमस्कार.

तुझ्याविषयीची आनंदाची बातमी ऐकली आणि लगेच तुला पत्र लिहावयास घेतले. "साहित्य सेवा वाचनालय' आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तू भाग घेतलास आणि प्रथम क्रमांक पटकावलास याबद्दल तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन! उत्तम स्मरणशक्ती, सभाधीटपणा, आत्मविश्वास आणि प्रसंगावधान हे तुझे गुण वाखाणण्याजोगे आहेत. आजवर तू सहभागी झालेल्या अनेक आंतरशालेय स्पर्धांमधूनही तू नेहमीच यशस्वी होत आली आहेस. एक वक्ता म्हणून श्रोत्यांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध कसे करून घ्यावे, हे तुला अनुभवाने नेमके माहीत झाले आहे; म्हणूनच तुझे वक्तृत्व इतर विदयार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरते.

भविष्यात तू एक सुप्रसिद्ध व्याख्याती आणि निवेदिका म्हणून नावलौकिक मिळवशील यात शंकाच नाही.

पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन करीत तुला पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देते. यशस्वी भव!


तुझी मैत्रीण,

विनया देशमुख

साखरवाडी.

ई-मेल : vinaya@xxxx.com


 2) सारांशलेखन :

विभाग - 1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा. 

उत्तर :

प्रेम, आपुलकी, स्नेह या भावना सौजन्यशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. ती स्वभावतः प्राप्त झालेली मानसिक वृत्ती आहे. तिला नम्रतेची जोड मिळाली की खऱ्या अर्थाने  माणुसकीचे नाते निर्माण होते. मानवातील सौजन्यशीलतेमुळे समाजात शांती व स्थिरता कायम राहते; म्हणूनच तिला महत्त्वाचे मूल्य म्हणून संबोधले जाते. 


आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :

1) जाहिरात लेखन :

योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. 

उत्तर :


2) बातमीलेखन :

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी 'साधना विद्यालय रायरी' या विद्यालयात 'मराठी भाषा दिन' साजरा झाला. 

या समारंभाची बातमी तयार करा. 

उत्तर :

मराठी भाषा दिन - उत्तम रितीने साजरा

रायरी, दि. 28 फेब्रुवारी 'साधना विदद्यालय' रायरी यांच्या वतीने काल 27 फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत मनोहर कोटणीस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. मराठी भाषा विभागाच्या प्रमुख श्रीमती सुमती नलावडे यांनी विविध सहशालेय उपक्रम आयोजित करीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

या ठिकाणी शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येत होता. अभिनय कौशल्याची जाण असलेल्या काही शिक्षकांनी शिखाडकर लिखित प्रसिद्ध नाट्यवेचांचे सादरीकरण केले तसेच समूहगायनाचाही कार्यक्रम आयोजित केला.


3) कथालेखन :

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :

शाळेत जाणारा कष्टाळू, प्रामाणिक मुलगा - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी - मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्यांची खरेदी - एक डागाळलेला - दोन दिवसांनी पाहणी - नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - तात्पर्य. 

उत्तर :

संगत

मध्यमवर्गीय मराठी संस्कारक्षम कुटुंबातला अमेय हा अत्यंत गुणी मुलगा होता. आईबाबांकडून तो चांगल्या सवयी शिकत होताच; पण आजी-आजोबांच्या संस्कारांतही तो वाढत होता. अमेय आता आठवीतून नववीत गेला होता.

नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. जुन्या मित्रांबरोबर त्याच्या गप्पा रंगल्या. या वर्षी दोन नवीन मुले आली होती. अमेय मुळातच बडबड्या आणि मनमिळाऊ होता, त्यामुळे या नव्या मुलांशी त्याची चटकन मैत्री झाली. आता तो बराचसा वेळ त्याच्या या नव्या मित्रांबरोबर घालवू लागला. त्यांच्याबरोबर राहून तोही त्यांच्यासारखेच वागायला लागला. पहिल्या बेंचवर बसणारा अमेय आता त्या दोघांबरोबर शेवटच्या बेंचवर बसू लागला. त्याच्या जुन्या मित्रांना जणू तो विसरलाच !

मुलांच्या खोड्या काढ, तासाला गप्पा मारत बस, शाळेला दांड्या मारून नव्या मित्रांबरोबर बाहेर खायला जा, असे बऱ्याचदा व्हायला लागले. या गडबडीत तो घरच्यांशी आणि शिक्षकांशी खोटे बोलायला लागला त्याला हा उनाडपणा अधिक आवडू लागला. त्यामुळे नेहमी सगळा गृहपाठ छान पूर्ण करणारा, परीक्षेच्या आधीच घडे वाचून टिपणे काढून ठेवणारा अमेय अभ्यासात मागे पडायला लागला. ही गोष्ट शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांना अमेयची काळजी वाटू लागली. त्यांच्या हुशार, गुणी विदयार्थ्याला वाईट संगत लागली आहे ही गोष्ट शिक्षकांनी अमेयच्या पालकांना सांगितली.

अमेयच्या घरीसुद्धा याबाबत चर्चा झाली आणि आजोबांनी वेगळ्या पद्धतीने त्याला समज दयायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी आजोबा अमेयला घेऊन बाजारात फेरफटका मारायला गेले आणि येताना जास्तीचे पैसे देऊन उत्तम दर्जाचे आंबे आणले. घरी आल्यावर त्यांनी अमेयला आंबे नीट बघून ठेवायला सांगितले, त्यातला एक आंबा जरासा डागाळलेला होता. अमेयने तो आजोबांना दाखवला. पण आजोबांनी तो परत पेटीत ठेवायला सांगितला. 

दोन दिवसांनी त्यांनी अमेयला पुन्हा आंबे कसे आहेत ते बघायला सांगितले. या वेळी मात्र सगळे आंबे खराब झाले होते. अमेयला आश्चर्य वाटले इतक्या उत्तम प्रतीचे सगळे आंबे खराब कसे झाले? तो आजोबांकडे गेला आणि हे सांगितले. तेव्हा आजोबा त्याला पुन्हा आंब्यांपाशी घेऊन गेले. त्यांनी तो डागाळलेला आंबा अमेयला दाखवला आणि म्हणाले, "हा खराब आंबा तू बाकी सगळ्या चांगल्या आंब्यांबरोबर ठेवलास! एका खराब आंब्यामुळे बाकी सगळे चांगले आंबे नासले. असेच असते बाळा. घरातून चांगले संस्कार देऊनच आईबाबा मुलांना बाहेरच्या जगात पाठवतात. आपल्या आजूबाजूची माणसेही तशीच चांगली असली तर आयुष्य सुंदर होऊन जाते. पण एखादी वाईट संगतही आपले आयुष्य नासवते. कळले?"

अमेयला सगळे नीट कळले होते. अमेय आता जसा वागत होता ते बरोबर नाही हेही त्याला उमगले कारण; तो मुळातच तेवढा सुज्ञ होता. शहाण्याला शब्दांचा मार पुरतो तसे अमेयचे झाले. रात्री त्याने या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केला. वाईट संगत असलेल्या मित्रांच्या आहारी जाऊन आपण स्वतःचे नुकसान केले ही गोष्ट त्याला मनोमन पटली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमेय आधीसारखा लवकर उठला, शाळेसाठी आवरले आणि मग आईबाबा, आजीआजोबांना सॉरी म्हणून शहाण्यासारखा शाळेत गेला. जाता जाता मात्र आजोबांकडे पाहून तो आश्वासक हसला.

तात्पर्य : असंगाशी संग करू नये.


इ) खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा :

1) प्रसंगलेखन 

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही मित्राचे मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा. 

उत्तर :

पारितोषिक वितरण समारंभ

10  डिसेंबरला सकाळी 10 वाजता सुहृद मंडळ, नाशिक आयोजित बाल-कुमार चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. आराध्यची जवळची मैत्रीण आणि त्याच्या चित्रकलेवी चाहती म्हणून मीसुद्धा या सोहळ्याला गेले होते. या स्पर्धेचं कळल्यापासूनच आराध्यने जोरदार तयारी सुरू केली होती.

कार्यक्रमाची सुरुवात छानशा निवेदनाने झाली. नंतर काही मुलांनी गणेशवंदन सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. पाहुण्यांना भेट म्हणून एक झाड आणि पुस्तक दिले आणि एका मुलाने पाहुण्यांचं सुंदर पोर्ट्रेट काढले होते त्याची फ्रेमसुद्धा भेट म्हणून पाहुण्यांना दिली. पाहुण्यांचं निवेदन झाल्यावर तोषवितरणाला सुरुवात झाली. जसजशी पारितोषिक जाहीर होत होती आमची उत्सुकता वाढत होती. द्वितीय पारितोषिकासाठीही आराध्यचं नाव जाहीर झालं नाही. तो बोलला नाही पण जरासा खट्टू झालाच. तेवढ्यात... " आणि प्रथम पारितोषिक विजेता आहे आराध्य टिळक" सूत्रसंचालकांनी जाहीर केलं. मी अक्षरश: ओरडलेच! आणि आराध्यला जोरात मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं. ज्यासाठी त्याने मेहनत घेतली होती त्याचं चीज झालं. 

आराध्याला प्रमुख पाहुण्या मा. रजनी गुप्ते यांच्या हस्ते पहिलं बक्षीस मिळालं. आयोजकांनी खूप अप्रतिम सोहळा ठेवला होता. विजेत्यांना मस्त पेन्सिलीच्या आकाराची ट्रॉफी, मेडल आणि रोख रक्कम दिली. आणखी एक पर्वणी अशी की विजेत्यांचे आणि स्पर्धेतील इतर निवडक चित्रांचं छोटसं प्रदर्शन भरवण्यात आलं होत.

हे प्रदर्शन बघण्यासाठी माफक दरात तिकीट ठेवलं होतं. प्रदर्शनातून जमणारा निधी संस्थेतर्फे पाय आणि तोंडाने चित्र काढणाऱ्या मुलांना मदत म्हणून 'स्पेशल आर्टिस्ट' या संस्थेला देण्यात येणार होता. प्रदर्शनातील काही भाग या मुलांच्या चित्रांसाठीही राखून ठेवण्यात आला होता. प्रदर्शन अगदी सुबक होतं. सगळ्यांनी वेगवेगळी चित्रे काढली होती. त्या प्रदर्शनात आराध्यचं चित्र बघताना खूप कौतुक वाटलं. आराध्यने बक्षीस मिळवलंच पण या चांगल्या कामातही त्याचा सहभाग होता, हे बघून खूप आनंद झाला. सोहळ्याची सांगता स्पेशल आर्टिस्ट संस्थेतील मुलांनी गायलेल्या प्रार्थनेने झाली.


2) आत्मकथन :

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा :



उत्तर :

समुद्राचे आत्मकथन

मी समुद्र बोलत आहे. आता मला ओहोटी असल्यामुळे मी तुला शांत दिसतोय पण आत खोलवर बरंच काही साचलंय तुझ्यासारखे बरेच जण रोज इथे येतात हुंदडतात, गज्जा करतात, पाण्यात डुंबतात आणि निघून जातात. शेवटी उस्ते अखंड आवाजानंतरची भयाण शांतता आणि किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिकच्या पाकिटांचा कचरा असा लाखो टन कचरा आत साचलेला आहे. तुम्ही मजा करता पण तुमची एका दिवसाची मजा मला किती भारी पडत असेल याचा कोणी विचार करता का? माझ्या आश्रयाला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, जलचर आहेत. या कचऱ्यामुळे. प्लास्टिकमुळे ते नाहक मरतात. मला किती वाईट वाटत असेल याचा विचार केलाय? तुमचे तुकाराम महाराज बरोबर म्हणायचे. “काय केले जळचरी धीवर त्यांच्या घातावरी।" त्या निष्पाप जलचरांचा काय दोष? तुमच्या सोईसाठी त्यांनी का भोगावं?

सांडपाण्याचे पाईप, सीलिंकसाठी बनवण्यात आलेले मोठाले खांब, खनिज तेल काढण्यासाठीची मशिन्स असं काय काय बनवलंय तुम्ही माझ्या पोटात. बरं एवढं सगळं कमी म्हणून की काय गणेशोत्सवात दरवर्षी हजारो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुम्ही इथे विसर्जित करता. त्या महिनोन्महिने तशाच असतात. लाटेबरोबर त्या बऱ्याचदा तुम्हांला किनाऱ्यावर आलेल्या दिसतात; पण त्याने तुम्हांला काहीच फरक पडत नाही. पुढच्या वर्षी पहिले पाढे पंचावन्न.

दरवर्षी गणेशोत्सव बघायला परदेशी पर्यटक चौपाटीवर येतात. पर्यायाने समुद्र आणि भारताचं निसर्गसौंदर्य बघतात. भारत निसर्गसौंदर्यान समृद्ध आहे असं तुम्ही सांगता पण इथे किनाऱ्यावर वेगळंच चित्र दिसतं. निसर्गसौंदर्य सोडाच घाणीने काळंकुट्ट झालेलं माझं पाणी आणि लाटेबरोबर किनाऱ्यावर आलेला कचरा एकूणच अस्वच्छता दिसते. शेवटी मी तरी किती साठवून ठेवू? त्या दिवशी उबग आला. मोठी लाट आली आणि हजारो टन कचरा माझ्या किनाऱ्यावर फेकून गेली. मला वाटलं असं झाल्यानंतर तरी तुम्हांला माझं महत्त्व कळेल.

पृथ्वीवरचा 70% भाग भी व्यापला आहे. माझ्यामुळेच तर जलचक्र सुरळीत चालू आहे. पाऊस, पाणी, जलाशय, मिठागरं, अख्खी पृथ्वी निसर्गाच्या मदतीने फिरते आहे. अमर्याद वापर, अस्वच्छता, प्रदूषण हे जर असंच सुरू राहिलं तर असहय होऊन एक दिवशी प्रलय येईल. मग काय करणार तुम्ही? काही करायला तुम्ही कोणी राहणारच नाही. जगभरातल्या सगळ्या समुद्रांची थोड्याफार फरकाने हीच कथा आहे. आज तू इथे आलीस माझं ऐकायचं ठरवलंस म्हणून मी सगळं स्पष्ट सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारांनी मी नेहमी हेच सांगत असतो पण तुम्ही तुमच्याच जगात इतके मग्न असता की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत !

एक लक्षात घ्या, तुमच्याकडे अफाट बु‌द्धिमत्ता आहे. त्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या सुखसोईसाठी अनेक गोष्टी करता आहात. तुम्हांला खूप पुढे जायचंय पण निसर्गाची शर्यत लावू नका. तुम्ही त्याच्याशी जिंकूच शकत नाही. कारण तुम्ही या निसर्गाचाच एक भाग आहात. तू मघाशी मला शांत म्हणालीस. बरोबर आहे माझ्याकडे संयम आहे म्हणून तुमच्या सगळ्या गोष्टी पोटात घेऊन मी अजूनही शांत आहे. पण त्या संयमाचा अंत बघू नका. वेळीच सावध व्हा! तुम्ही एकदा निसर्गाला जपा तो अनंत वेळा तुम्हांला जपेल हे नक्की !!


3) वैचारिक :

'पर्यावरण जतन - काळाची गरज' या विषयावर तुमचे विचार लिहा. 

उत्तर :

पर्यावरण जतन - काळाची गरज

फळाफुलांनी हिरवाईने 

नटलेल्या अवनीची

बघा लोकहो आज अशी ही

काय दुर्दशा झाली....

पूर्वी आपण हिरव्या आणि निळ्या रंगांत रंगवून पृथ्वीचं चित्र काढायचो पण या रंगांची जागा आता काळ्या, करड्या आणि तपकिरी रंगांनी, टोलेजंग इमारतींनी कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या धुराने घेतली आहे. अचानक पृथ्वीमातेचे शांत सुंदर रुपडं बदललं आपल्या फायदयासाठी माणसाने मोठाली शहरं उभारली; त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात. पाऊस पाडायला मदत करतात. या सगळ्या गोष्टी आपण विज्ञानाच्या पुस्तकात वाचतो. पण त्या पुस्तकातच राहतात. वाचलेल्यापैकी आपण किती गोष्टी अंगीकारतो ? 5 जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. पण पर्यावरणाचं महत्त्व एका दिवसापुरतेच मर्यादित आहे का ?

माणसाने प्रगती करायलाच हवी, नवनवीन शोध लावायलाच हवेत; पण पर्यावरणाचा विचार करूनच त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडतो. त्यासाठी आजकाल आपण 'नेचर कॅम्पस'ला जातो कारण शहरात इमारतीच्या गोतावळ्यात डोळ्यांना सुखावणारं हिरवंगच्च झाड हरवलंय. झाडांचे फायदे आपल्याला कळले असले तरी वळले नाहीत, पर्यावरणाचा समतोल राखण्यात झाडं महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडांमुळेच हवा खेळती आणि शुद्ध राहते. पाऊस पाडण्यासाठी झाडंच पोषक वातावरण निर्माण करतात.

आज पृथ्वीवर पुरेशी झाडं नाहीत त्यामुळे ऋतुचक्र बदललं आहे. उन्हाळ्याची दाहकता वाढली आहे. ठिकठिकाणी वणवे लागून त्यात मनुष्य आणि वित्तहानी होत आहे. वातावरण अशुद्ध असल्याने विषाणूंची संख्या वाढते आहे. त्यामुळे आजार बळावत आहेत. पूर्वी माहीतही नव्हते अशा जीवघेण्या आजारांनी आपल्याला वेढलं आहे. काही आजारांवर खात्रीशीर औषधही सापडलेलं नाही. 

ठिकठिकाणी आगी लागून जंगलंच्या जंगलं नष्ट होत आहेत. अमेझॉन जंगलाला लागलेली आग हे धडधडीत उदाहरण आपल्यासमोर आहे. या आगीमुळे अॅमेझॉनमधील अनेक दुर्मीळ वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या. जंगलाचा मोठा भाग आणि हिरवळ नष्ट झाली. अमर्याद कत्तल आणि प्राण्यांच्या तस्करीसाठी केली जाणारी शिकार, प्रदूषण, पर्यावरण असमतोल यांमुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उत्तर ध्रुवावर दिसणारं पांढरं अस्वल, वाघ, गैंडा, व्हेल मासा, बर्फाळ प्रदेशातील चित्ता, कासव, लाल पांडा, गोरिला हे आणि अशा अनेक प्रजातींना नामशेष होण्याचा धोका आहे. नैसर्गिक बदल हे होतच असतात; परंतु मानवनिर्मित बदलांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. ओझोन वायूचा थर नष्ट होत चालल्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. परिणामतः बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. चक्रीवादळ. त्सुनामी यांचा धोका वाढला आहे. 

आपण सुखसोईंचा उपभोग घेत आरामात जगतो आहोत पण पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे. होणारे बदल भीषण आहेत. पावसाळ्यात खरंच 'ये रे ये रे पावसा' असं म्हणायची वेळ आली आहे. निसर्गसंपदाच नष्ट झाली तर ऋतुचक्र सुरळीत चालणार तरी कसं? कडक ऊन पडायलाच हवं, भरपूर पाऊसही पडायलाच हवा आणि मस्त थंडीही पडायलाच हवी तरच हे निसर्गचक्र चक्रनेमिक्रमेण समतोलपण ठेवत फिरत राहील. आपली कृषिप्रधान संस्कृती 'ये रे ये रे पावसा' म्हणणारी आहे. रेन रेन गो अवें म्हणणारी नाही. पर्यावरणाचे विविध घटक एकमेकांवर अवलंबून असतात. एकमेकांच्या साथीने सुसूत्रतेने ते आपलं कार्य करतात पण पर्यावरणाची ही साखळी अनंत तुकड्यांत विखुरली आहे. ती परत जोडायलाच हवी आणि यासाठी 'पर्यावरण संवर्धन' ही एक चळवळ व्हायला हवी. प्रगती करूया पण पर्यावरणाचा, निसर्गाचा विचार करूनच. प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधला तरंच पुढचा विनाश टाळता येईल. शेवटी इतकंच म्हणावेसे वाटते :


विचार कर तू मनु थोडका

शीक मंत्र तू नवा

जगा जगू दया या तत्त्वाने

वृक्षारोपण करा.

झाडे लावा झाडे जगवा

प्रजातीही वाचवा

प्रत्येकाने झाड लावुनी

संकल्प करुया नवा.

Previous Post Next Post