पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी 




१. अ )  दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. कुकने ................. विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. 

उत्तर : कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. 

2. महाबळेश्वरजवळील भिलार हे .............. गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 

उत्तर : महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 


ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 

1. माथेरान  -  थंड हवेचे ठिकाण 

2. ताडोबा  -  लेणी

3. कोल्हापूर  -  देवस्थान 

4. अजिंठा  - जागतिक वारसास्थळ

उत्तर : 

चुकीची जोडी : ताडोबा  -  लेणी

दुरुस्त जोडी :  ताडोबा  -  अभयारण्य


२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1. आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. 

उत्तर :

i) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.

ii) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.

iii) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक विविध ठिकाणी जात असतात.

iv) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात. 

त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.


2. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. 

उत्तर :

भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण -

i) आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

ii) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. 

iii) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो परदेशातून येतात. 

iv) भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे.


३. टिपा लिहा. 

1. पर्यटनाची परंपरा. 

उत्तर :

i) अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला.

ii) भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा-यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणे हे त्यांचे धार्मिक पर्यटन होते. 

iii) व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विदयाभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत.

iv) मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.


2. मार्को पोलो. 

उत्तर :

i) मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इ.स. १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला.

ii) तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा पहिला तो युरोपियन होय. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्त्रोतग्रंथ ठरला. 

iii) आशियातील समाजजीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.

iv) भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविदया यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे.

3. कृषी पर्यटन. 

उत्तर :

i) शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'कृषी पर्यटन' होय.

ii) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत.

iii) कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य' म्हणून घोषित झाले आहे.

iv) पावसाचे प्रमाण कमी असूनही इझ्राएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम पाहण्यासाठी तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी, विदयार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.


४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?

उत्तर :

आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे -

i) पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. 

ii) पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे.

iii) त्यांना प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत.

iv) ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. 

v) पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहितीपुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुमाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

vi) दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.


2. पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते ?

उत्तर :

i) पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो ?

ii) तेथील हस्तोदयोग व कुटीरोदयोग यांचा विकास होतो. त्या वस्तुंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते तेथील खादयपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. तसेच पर्यटक तेथील आठवण म्हणून स्थानिक वसस्तु विकत घेतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारात वाढ होते. 

iii) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, ऑटोरिक्षा, टॅक्सी यासारख्या वाहनांमुळे वाहतूक क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळतो.


3. आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल ?

उत्तर :

i) आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी आम्ही आपला परिसर स्वच्छ ठेवू. 

ii) रस्त्याच्या दुतर्फा मनमोहक झाडे. फूलझाडे लावू. 

iii) परिसरातील नदी, तलाव यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयाला संपर्क साधून प्रयत्न करू. या नदीत, तलावात, पर्यटकांनाही पाणी बॉटल, प्लॅस्टिक, नारळाची टरफले यासारखा कचरा टाकण्यासाठी सक्त मनाई करू. तेथे कचऱ्यासाठी कचऱ्याचे डबे ठेवू. 

iv) जवळच्या ऐतिहासिक वास्तुंची काळजी घेऊ. 

v) पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम वॉटर पार्क सारखे प्रकल्प सरकारच्या मदतीने राबवू.


५. पुढील संकल्पनाचित्र स्पष्ट करा. 

महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटनस्थळे....




उत्तर :





६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. 

उत्तर :

पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत -

i) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग.

ii) खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग.

iii) हस्तोदयोग व कुटीरोदयोग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने.

iv) हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग.

v) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग.

vi) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.


2. पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर :

पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार -

i) ऐतिहासिक पर्यटन : पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.

ii) भौगोलिक पर्यटन : अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.

iii) आंतरराष्ट्रीय पर्यटन : आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोर्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते.

Previous Post Next Post