निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय इयत्ता दहावी
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1. निवडणूक आयुक्तांची नेमणूक .............. करतात.
उत्तर : निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ............... यांची नेमणूक झाली.
उत्तर : स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली.
3. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ................ समिती करते.
उत्तर : मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
1. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे, कारण -
i) त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात..
ii) निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो.
iii) धाकदपटशा, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.
2. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे कारण -
i) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो.
ii) एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.
iii) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले, तर पक्षांतरबंदी कायदयाप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.
3. एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
उत्तर :
हे विधान चूक आहे; कारण -
i) निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
ii) राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.
iii) म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे; त्यामुळे एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.
३. संकल्पना स्पष्ट करा.
1. मतदारसंघाची पुनर्रचना
उत्तर :
i) विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते.
ii) निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले. परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.
iii) खेड्यांतून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखादया मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते, तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते.
iv) हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.
2. मध्यावधी निवडणुका
उत्तर :
i) विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या (पाच वर्षे) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात.अशा निवडणुकांना 'मध्यावधी निवडणुका' असे म्हणतात.
ii) बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते.
iii) काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते. परंतु मुदतीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात येते.
iv) अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा दयावा लागतो. अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा वा विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात.
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर :
५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर :
निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो -
i) मतदार यादया तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.
ii) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.
iii) उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे.
iv) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे.
v) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.
vi) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.
2. निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.
उत्तर :
i) भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात.
ii) या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते.
iii) संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते.
iv) निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही.
3. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
उत्तर :
i) निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये, यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते, त्या आचारनियमावलीस 'निवडणूक आचारसंहिता' असे म्हणतात.
ii) निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात.