क्षेत्रभेट स्वाध्याय
क्षेत्रभेट स्वाध्याय इयत्ता दहावी भूगोल
प्रश्न १. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ ) तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.
उत्तर :
क्षेत्रभेटीसाठी आम्ही गोदावरी नदी या क्षेत्राची निवड केली. क्षेत्रभेटीसाठी ठरलेल्या दिवशी आम्ही नागपूरहून नाशिकला जाण्यासाठी सकाळी ९.०० च्या सुमारास निघालो. तिथे प्रत्यक्षात भेट देऊन तेथील परिसर बारकाईने न्याहळला व स्थानिक परिसरातील लोकांकडून माहिती मिळविली. या क्षेत्रभेटीचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे.
गोदावरी नदी - गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नदयांमध्ये केली जाते. या नदीला 'दक्षिण गंगा' असेही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर ११ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात झाला आहे. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. भीमा, वैनगंगा इ. उपनदया असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.
गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३,१९,८१० असून या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा या राज्यांचा समावेश आहे. या नदीच्या उगमस्थानाची उंची १,६२० मी. (५,३१० फूट) इतकी असून सरासरी प्रवाह ३,५०५ घन मी./से. (१,२३,८०० घन फूट/से.) आहे. इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा या गोदावरीच्या उपनदया आहेत.
गोदावरी नदीतील पाणी ऋतुप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. गोदावरी नदीवर गंगापूर, नांदूर मधमेश्वर, डौलेश्वरम या ठिकाणी धरणे बांधली आहेत. या परिसरातील लोकांचे जीवन या नदीने समृद्ध केले आहे. म्हणून गोदावरीस महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्याची जीवनवाहिनी समजतात. गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो.
नदी ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. ती मानवाला बरेच काही देऊन जाते. परंतु मानव स्वार्थापोटी त्यात प्रदूषण करून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो.
या परिसराची माहिती दिल्याबद्दल मी व माझा मित्र परिवार तसेच शिक्षक या स्थानिक परिसरातील लोकांचे मनःपूर्वक आभारी आहोत.
आ ) कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
उत्तर :
एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन तेथील भौगोलिक स्थिती जाणून घेणे, हा क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू असतो. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या बऱ्याच वस्तू या निसर्गनिर्मित नसतात. त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ती आपल्यापर्यंत येते. ती कशी तयार होते. हे जाणून घेण्यासाठी आमच्या वर्गाने शिक्षकांच्या मदतीने कारखान्याला भेट देण्याचे ठरविले. त्यासाठी पुढीलप्रमाणे प्रश्नावली तयार केली आहे.
i) ज्या कारखान्याला भेट दयायची आहे. त्या कारखान्याचे नाव काय आहे ?
ii) या कारखान्यात कोणत्या वस्तूचे उत्पादन केले जाते ?
iii) कारखान्याचे स्थान व ठिकाण कोठे आहे ?
iv) तुमच्या परिसरापासून कारखाना किती अंतरावर आहे ?
v) कारखान्याचा परिसर किती क्षेत्रफळात आहे ?
vi) या कारखान्याच्या मालकाचे नाव काय आहे ?
vii) कारखान्यात एकूण किती कामगार काम करतात ?
viii) सकाळ पाळी, दुपार पाळी, रात्रपाळी अशा तीन विभागात कामगा वाटले गेले आहेत काय ?
ix) किती किती तासांची प्रत्येक भागाची पाळी असते ?
x) या कामगारांना 'लेबर अँक्ट' लागू केला आहे की नाही ?
xi) जेवणाची सुटी किती तासानंतर दिली जाते ?
xii) तयार झालेला माल कोठे कोठे पाठविला जातो ?
xiii) कामगारांना आरोग्याशी संबंधित काही सुविधा दिल्या जातात का ?
xiv) महिला कामगार असल्यास काही विशेष सोयी आहेत काय?
इ ) क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल ?
उत्तर :
क्षेत्रभेटीसाठी ज्या भागाची निवड केली जाते त्या परिसरातील जवळपासच्या गावात राहण्याची सोय केली जाते. अशावेळी आपल्यामुळे गावकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. जसे परिसर स्वच्छ करून घ्यावा. परिसर स्वच्छ करून झाल्यानंतर निघालेला कचरा एकत्र गोळा करून ठेवावा व गावाच्या दूर एक मोठा खड्डा करून जो कचरा खड्ड्यात पुरण्यासारखा असेल तो खड्ड्यात टाकावा, जो जाळण्यासारखा असेल तो जाळून टाकावा. तसेच जेवणानंतर, नास्ता झाल्यानंतर खरकटे अन्न किंवा खराब झालेले अन्न, फळाच्या साली, भाज्यांचे देठ वगैरे अशा वस्तू खड्ड्यात टाकाव्या. राहुटी उचलतेवेळी त्या भागाची स्वच्छता करावी व खड्ड्यात कचरा टाकून खड्डा मातीने बुजवावा.
ई ) क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल.
उत्तर :
क्षेत्रभेटीसाठी जाताना पुढील साहित्य सोबत घ्यावे.
i) क्षेत्रभेटीस जाताना नोंदवही जवळ ठेवावी. त्यात अभ्यासाशी संदर्भातील प्रत्येक घटकाची नोंद घ्यावी.
ii) संबंधित क्षेत्राचा नकाशा सोबत घ्यावा, त्यामुळे क्षेत्राचे योग्य निरीक्षण करता येते.
iii) त्याचबरोबर नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, दिशा समजण्यासाठी होकायंत्र, विविध वस्तू, पदार्थ यांचे नमुने गोळा करण्यासाठी पिशवी, शक्य असल्यास कॅमेरा व दुर्बिण बरोबर घ्यावी.
iv) क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रात गेल्यानंतर तेथील विविध घटकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे, त्याचबरोबर तेथील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
उ ) क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.
उत्तर :
i) भूगोल विषयाद्वारे आपण विविध भूरूपे, हवामान, मृदा, वनस्पती, प्राणी, खनिजे इत्यादी नैसर्गिक घटकांची तसेच व्यवसाय, वाहतूक व संदेशवहन इत्यादी सांस्कृतिक घटकांचीही माहिती मिळवितो.
ii) एखादया स्थळाची किंवा प्रदेशाची माहिती पुस्तके व नकाशे यातून मिळविता येते; पण ती अप्रत्यक्षपणे मिळविलेली माहिती असते. एखादया क्षेत्रास भेट देऊन आपणास प्रत्यक्ष ज्ञान मिळते.
iii) नकाशात दाखविलेल्या प्रदेशाची आपण केवळ कल्पना करू शकतो. परंतु प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून तेथील वस्तुस्थिती समजते.
iv) क्षेत्रभेटीच्या वेळी आपण तेथील भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण करतो, तेव्हा आपल्या अनेक शंकांचे निरसन होते. क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्षात लोकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते.
v) क्षेत्रभेटीमुळे पुस्तकात अभ्यासलेली माहिती अधिक चांगली समजते. त्यामुळे भूगोल विषयात क्षेत्रभेट आवश्यक असते.