लोकसंख्या स्वाध्याय

लोकसंख्या स्वाध्याय

लोकसंख्या स्वाध्याय

लोकसंख्या स्वाध्याय इयत्ता आठवी


प्रश्न. 1. खालील विधाने पूर्ण करा.  

1) जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या ..................

i) कमी होते

ii) वाढते

iii) स्थिर होते

(iv) अतिरिक्त होते

उत्तर :

जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकंसख्या वाढते.


2) ......................... वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 

i) 0 ते 14 

ii) 14 ते 60

iii) 15 ते 60

iv) 15 ते 59

उत्तर :

15 ते 59 वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 


3) समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार ..................... घटकावर अधिक अवलंबून असतो.

i) लिंग गुणोत्तर

ii) जन्मदर

iii) साक्षरता

iv) स्थलांतर

उत्तर :

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरता घटकावर अधिक अवलंबून असतो.


प्रश्न. 2. खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा. 

1) प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ किती व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किमी मध्ये किती लोक राहतात हे समजते.


2) साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते.

उत्तर :

हे विधान योग्य आहे.


3) ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते, त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे..

ज्या प्रदेशात लोकसंख्येचे स्थलांतर होते, त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवासुविधांवर ताण पडतो.


4) अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

केवळ अर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होत नाही. प्रदेशांच्या विकासाचा संबंध तेथील लोकसंख्येचे जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य यावर अवलंबून असते.


5) विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. 

अति विकसित प्रदेशाचा निर्देशांक एक असतो.


प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात ?

उत्तर :

लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात स्त्री-पुरुषाप्रमाणे वयोरचना, लिंग गुणोत्तर, कार्यानुसार लोकसंख्येची रचना आणि साक्षरता या बाबी विचारात घेतल्या जातात.

i) वयोरचना - लोकांच्या वयानुसार मानवाची कार्यक्षमता, सामाजिक स्थान, शिक्षण, व्यवसाय इत्यादी बाबी वयोमानाशी संबंधित असतात.

ii) लिंग गुणोत्तर - लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय. लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री-पुरुष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते.

कार्यानुसार लोकसंख्येची रचना - प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटांत वर्गीकरण केले जाते. प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असल्यास ती लोकसंख्या उद्यमशील मानली जाते.

साक्षरता - साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिक दृष्ट्या प्रगत होतो. साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते.


2) लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा. 

उत्तर :

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक -

 अ) प्राकृतिक घटक , ब) आर्थिक घटक

अ) प्राकृतिक घटक - यामध्ये स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा खनिज संपत्ती या घटकांचा समावेश होतो. 

ब) आर्थिक घटक - यामध्ये शेती, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक, बाजारपेठ या घटकांचा समावेश होतो.

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्रतिकूल घटक -

अ) राजकीय घटक ब) सामाजिक घटक

) राजकीय घटक - यामध्ये युद्ध, राजकीय अस्थिरता. राजकीय धोरण या घटकांचा समावेश होतो.

ब) सामाजिक घटक - यामध्ये वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा या घटकांचा समावेश होतो. 


3) लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या असतील ?

उत्तर :

लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशांत पुढील समस्या असतील. 

i) लोकसंख्येत वाढ झाल्याने लोकसंख्येची घनता वाढते व त्याचा बराच ताण साधनसंपत्तीवर पडतो. 

ii) लोकांची संख्या वाढल्याने एकाच व्यवसायात लोकांमध्ये स्पर्धा सुरू होते. 

iii) लोकसंख्येच्या अतिरिक्त ताणामुळे जमिनीवर येणारा दबाव, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अयोग्य वापर, शहरांची अनिर्बंध वाढ, काही प्रदेशात झालेले लोकसंख्येचे केंद्रिकरण, उदयोगधंदयाच्या विस्तारामुळे वाढलेले प्रदूषण यामुळे मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व घटकांचा निसर्गावर प्रतिकूल परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून परिसंस्थांनाचे असंतुलन होत आहे.


4) लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या जाणवतात ?

उत्तर :

लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत पुढील समस्या जाणवतात. या प्रदेशात स्त्रियांचे प्रमाण जास्त व पुरुषांचे प्रमाण कमी आहे किंवा पुरुषांचे जास्त व स्त्रियांचे कमी प्रमाण असेल अशा ठिकाणी वेश्या व्यवसायाला चालना मिळते. विवाहासाठी जोडीदार मिळणे कठीण होते. उदा. गुजरात, राजस्थान, हरियाणा यासारख्या प्रदेशात मुलींची संख्या कमी असल्याने मुलांच्या विवाहाचा प्रश्न उद्भवतो. विवाहासाठी मुलींचे अपहरण दुसऱ्या राज्यातून (जिथे मुलींचे प्रमाण जास्त आहे.) केले जाते. तसेच मुलींची तस्करी केली जाते. यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात. 


प्रश्न. 4.भौगोलिक कारणे द्या. 

1) लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

उत्तर :

कारण - i) लोकसंख्या हे नैसर्गिक संसाधन असून मानवी गुणवत्ता हा नैसर्गिक संसाधनाचा आत्मा आहे. 

ii) इतर नैसर्गिक संसाधनांप्रमाणे मानवी शक्ती निष्क्रीय नसून विचारशील व कृतीशील आहे. 

iii) मानवी शक्तींद्वारे जगात अनेक नवनवीन शोध लागत आहेत. तसेच अनेक वस्तूंचे उत्पादन करून त्यांचा उपभोगही घेत आहे. कोणत्याही देशाच्या विकासासाठी ही शक्ती निर्णायक भूमिका बजावते. म्हणून लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. 


2) कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा आहे.

उत्तर :

कारण - i) कार्यकारी लोकसंख्येचा गट म्हणजे १५ ते ५९ या वयांतील व्यक्तींचा गट होय. 

ii) या गटातील व्यक्ती नोकरी, व्यवसाय व्यस्त असतात. 

iii) प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत कार्यकारी लोक प्रत्यक्षरित्या सहभागी असतात. 

iv) जर प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते. अशा प्रदेशाचा विकास वेगाने होतो. त्यामुळे कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा आहे.


3) वयोगटरचनेचा अभ्यास आवश्यक आहे.

उत्तर :

कारण - i) प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटकांचा वयोगटांनुसार विचार केला जातो. ती लोकसंख्येची वयोगट रचना असते. 

ii) वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठी होते. 

iii) मानवाची कार्यक्षमता, सामाजिक स्थान, शिक्षण, व्यवसाय इत्यादी बाबी वयोरचनेशी संबंधित असतात. म्हणून वयरचनेचा अभ्यास आवश्यक आहे. 


4) साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो.

उत्तर :

कारण - i) साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. 

ii) साक्षरता हा सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. 

iii) साक्षरतेमुळे नवीन विचार समजतात माणूस विचार करण्यास प्रवृत्त होतो. तसेच कोणत्याही व्यवसायात काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण आवश्यक असते. 

iv) देशातील साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो. त्यामुळे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो.


5) मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते. 

उत्तर :

कारण - i) आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. 

ii) मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य शून्य ते एक या दरम्यान असते. 

iii) अति विकसित प्रदेशाचा निर्देशांक एकच्या जवळ असतो. तर प्रदेशातील प्रगतीचे मान जसजसे कमी होत असेल तसतसा निर्देशांक कमी कमी होत जातो. 

iv) एखादया प्रदेशाचा विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक शून्याच्या जवळ असतो. त्यामुळे विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते. 


प्रश्न. 5. टिपा लिहा.

1) लिंग गुणोत्तर

उत्तर :

i) एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील पुरुषांची संख्या व स्त्रियांची संख्या या दोहोंमधील प्रमाणास लिंग गुणोत्तर म्हणतात. 

ii) लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वांत नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय. 

iii) लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात.

iv) दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात, तर दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात. 


2) वयोगट रचना

उत्तर :

i) एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटांनुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. 

ii) या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठी ही होतो. 

iii) यातील कार्यरत गटात १५ ते ५९ वयांतील व्यक्ती येतात. या गटातील व्यक्ती नोकरी, व्यवसायात व्यस्त असल्याने प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी असतात. अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते. अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. 

iv) अवलंबित लोकसंख्येचे १५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती असे उपगट केले आहे. या गटातील व्यक्तींचे ज्ञान व अनुभव हा अमूल्य ठेवा असून तो समाजाला उपयुक्त ठरतो.


3) साक्षरता 

उत्तर :

i) भारतात व्यक्तीस लिहिता-वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते. वय वर्षे ७ पेक्षा अधिक वयोगटांतील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते. 

ii) साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. 

iii) साक्षरतेमुळे नवीन विचार समजतात व माणूस विचार करण्यास प्रवृत्त होतो. कोणत्याही व्यवसायात काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण आवश्यक असते. 

iv) साक्षरत हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. 

v) साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. तसेच साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो.

Previous Post Next Post