जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल

जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल

जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल ?

उत्तर :

जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण होणे आवश्यक आहे, म्हणून तिचे व्यवस्थापन विचारपूर्वक करण्यात आले पाहिजे, की ज्यामुळे शाश्वततेबरोबरच संरक्षणही होईल. जैवविविधतेचे संवर्धन समाज विविध प्रकारे करीत आला आहे. अलीकडच्या काळात जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार व राष्ट्रीय पातळीवर कायदे करण्यात आले आहेत, तसेच संवर्धनासाठी विविध कार्यक्रम सुरू केले गेले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. 

i) पवित्र नैसर्गिक परिसर व प्रजाती - भारतात विविध ठिकाणी समाजाने 'पवित्र' म्हणून घोषित केलेले परिसर किंवा प्रजाती यामुळे काही परिसर (देवराई), तलाव/जलाशय व गवताळ कुरणे यांचे संधारण होत आले आहे. राजस्थानमध्ये डेमॉयझेल क्रेन या हिवाळी स्थलांतरित पक्ष्याचे ग्रामस्थ संरक्षण करतात व त्यास खाद्यही पुरवतात. महाराष्ट्रात पुण्याजवळ मोराची चिंचोली येथे अशाच प्रकारे ग्रामस्थ मोरांचे संरक्षण करतात. धार्मिक किंवा सांस्कृतिक कारणांसाठी अशा प्रकारे ग्रामस्थांनी परिसर प्रजातींचे संरक्षण केल्याची उदाहरणे आहेत.

ii) पारंपरिक व्यवस्थापन पद्धती - अनेक समाजांनी आपल्या पारंपरिक रूढी, नियम व प्रचलित पद्धतीचे पालन केले आहे. ज्यामुळे स्रोतांची शाश्वतता जोपासली गेली आहे. तसेच व्यवस्थापन अशा प्रकारे केले जाते की ज्यामध्ये स्त्रोतांच्या वापराचे व्यवस्थापन लोकांच्या एका लहान गटाकडे असते. त्या गटांनाच एखादया विशिष्ट परिसंस्थेत प्रवेश असतो किंवा स्रोतातील प्रजातींच वापर करता येतो.

iii) सार्वजनिक बियाणे पतपेढ्या - उत्तराखंडमध्ये टिहरी गढवाल येथील शेतकरी ‘बीज बचाओ आंदोलनांसाठी' विविध पिकांचे बियाणे गोळा करण्यासाठी तेथील प्रदेशात प्रवास करतात. 'बीज बचाओ आंदोलन' ही अशी चळवळ आहे की ज्यामध्ये हिमालयाच्या गढवाल प्रदेशातील स्थानिक बियाण्यांचे संरक्षण केले जाते.

Previous Post Next Post