टिपा लिहा विद्युतनिर्मिती आणि पर्यावरण
उत्तर :
ऊर्जेच्या विविध स्रोतांपासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला विद्युत निर्मिती असे म्हणतात.
i) कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. यामुळे हवा प्रदूषित होते. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनोक्साइड तयार होतो. याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान वाढ हे त्याचेच उदाहरण आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साइडमुळे आम्ल-वर्षा सारखे परिणाम होतात. जीवाश्म इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात. यामुळे दम्यासारखे श्वसनसंस्थेचे विकार होतात.
ii) कोळसा, खनिज तेल (पेट्रोल, डिझेल इत्यादी) आणि नैसर्गिक वायू (LPG, CNG) ही सारी जीवाश्म इंधने (खनिज इंधने) तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागली आहेत. शिवाय भूगर्भातील त्यांचे साठेही मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्यकाळात हे साठे संपणारच आहेत. असे म्हटले जाते की ज्या वेगाने आपण हे इंधनांचे साठे वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे जागतिक साठे येत्या 200 वर्षांत, तर नैसर्गिक वायंचे साठे येत्या 200-300 वर्षांत संपू शकतात.
iii) अणू-ऊर्जा वापरातील आण्विक-कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता यासारख्या धोक्यांचीही संभावना निर्माण होते.
अशाप्रकारे खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणावर विपरित परिणाम करते.