स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा
उत्तर :
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट करता येईल.
अ) स्त्रीशक्तीचा आविष्कार : i) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी १९७२ मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली.
ii) समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला.
iii) ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले.
iv) या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला.
ब) चिपको आंदोलन : i) १९७३ मध्ये चिपको आंदोलन घडून आले होते. या आंदोलनात स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार दिसून आला.
ii) हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले.
iii) या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला 'चिपको आंदोलन' म्हणतात.
क) मद्यपानविरोधी आंदोलन : i) आंध्र प्रदेशात १९९२ मध्ये 'मद्यपान विरोधी चळवळ' सुरू झाली.
ii) १९९२ मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंटा गावात तीन तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरण पावले.
iii) या घटनेच्या निमित्ताने गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी अरक (स्थानिक दारू) विक्रीचे दुकान बंद पाडले. ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येताच गावोगावी तिचा परिणाम झाला.
iv) राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारूविक्री विरोधात कडक धोरण स्वीकारले.
ड) इतर उदाहरणे : i) तसेच महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून सुरू झालेल्या भूदान चळवळीत विनोबांनी स्त्री शक्तीचा उपयोग केला. स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या.
ii) निजामशाही व सरंजामी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्तिलढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. हा भाग वेठबिगारमुक्त झाल्याने स्त्रियांची या संकटातून मुक्तता झाली.