वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
उत्तर :
i) वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन फुलांच्या साहाय्याने होते.
ii) पुमंग आणि जायांग हे फुलातील अनुक्रमे नर आणि मादी भाग आहेत.
iii) स्त्रीकेसराच्या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो.
iv) यात एक एकगुणित अंडपेशी आणि दोन एकगुणित ध्रुवीय केंद्रके असतात.
v) परागीभवन क्रियेने परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन तेथे अंकुरित होतात.
vi) यामुळे त्यात दोन पुंयुग्मक आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते.
vii) दोन पुंयुग्मक वाहून नेणारी परागनलिका कुक्षीवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटून पुंयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात.
viii) त्यांतील एक पुंयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो. या क्रियेला फलन म्हणतात.
ix) दुसरे पुंयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत दोन पुंयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन म्हणतात.
x) फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. या बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे तयार होते. अशा रितीने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होते.