पहिल्या महायुद्धाची कारणे

पहिल्या महायुद्धाची कारणे

पहिल्या महायुद्धाची कारणे

पहिले महायुद्ध :


पाश्र्वभूमी :


20 वे शतक जगाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण घटकांनी भरलेले होते. या शतकाच्या सुरुवातीला जगात अनेक संघर्ष सुरू झाले. युरोपियन राष्ट्रांमध्ये साम्राज्य उभारणीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेचे अनेक दुष्परिणाम झाले. या शतकाच्या सुरुवातीला विनाशकारी महायुद्धास जगाला सामोरे जावे लागले. या युद्धात संहारक हत्यारे, शस्त्रास्त्रे, रणगाडे, युद्धनोेका, मशीनगनस (यांत्रिक बंदुका), विध्वंसक विस्फोटके यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास आला. युद्धोत्तर अनेक देशांमध्ये हुकूमशाही राजवटी प्रस्थापित झाल्या. फॅसिस्ट व नाझी प्रणालींमुळे मानवी मनाची संकुचित व नकारात्मक बाजू समोर आली. 


संघर्षाचे युग :


जगात बदल घडवून आणणाऱ्या 20 व्या शतकाच्या सुरुवातीचे यथार्थ वर्णन 'संघर्षाचे युग' या शब्दांत केले जाते. या काळात जगातील अनेक देशांच्या सीमा बदलल्या. सशस्त्र संघर्षात लाखो लोकांची आहूती पडली. मात्र याकाळात झालेली विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रचंड प्रगती, हुकूमशाही राजवटीला विनाश व लोकशाहीचा प्रसार आणि आंतरराष्ट्रवादाचे प्रयोग ही या काळाची सकारात्मक बाजू होती असे म्हणता येईल. 


संघर्ष युगाचा युगाचा एक महत्त्वाचा टप्पा 1914 साली पहिल्या महायुद्धाने सुरू झाला. या युद्धामुळे जगातील राजकारणात अनेक दूरगामी बदल झाले. या काळात युरोपीय राष्ट्रांमध्ये अतिरेकी महत्त्वाकांक्षा, परस्पर अविश्वास, वेमनस्य व कलह निर्माण होऊन युरोपातील वातावरण स्फोटक बनले. यातूनच पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. या महायुद्धात भारतासह जगातील बहुसंख्य राष्ट्रे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी झाली होती. या युदधामागे अनेक गुंतागुंतीची कारणे होती, ती पुढीलप्रमाणे -


युरोपीय राष्ट्रांचा साम्राज्यवाद :


19 व्या शतकात राष्ट्रांनी वसाहतवाद, आणि आर्थिक साम्राज्यवाद यांचा पुरस्कार केला. ओेदयोगिकीकरण झालेल्या प्रत्येक राष्ट्राला युरोपबाहेर आपल्या वसाहती स्थापन करणे आवश्यक वाटू लागले. स्वत:च्या मालकीची मोठी साम्राज्ये असणे हे राष्ट्रीय प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. युरोपीय व्यापारी आशिया खंडातील वेगवेगळ्या भागात पूर्वीपासून व्यापार करीतच होते. आफ्रिका खंडाचा शोध लागल्यानंतर युरोपीय व्यापारी ओेदयोगिकदृष्टया अविकसित असलेल्या आफ्रिका-आशिया खंडाकडे वळले. 


आशिया व आफ्रिका खंडामध्ये व्यापारासाठी जाणाऱ्या युरोपीय राष्ट्रांची काही काळातच साम्राज्यवादी मानसिकता बनली. या खंडातील प्रदेश म्हणजे युरोपीय राष्ट्रांच्या दृष्टीने हुकमी बाजारपेठा व कारखान्यासाठी कच्चा माल पुरविणारे प्रदेश म्हणून त्यांना मोलाचे वाटत होते. आपल्या किफायतशीर व्यापारात आशिया व आफ्रिका खंडातील राज्यकर्त्यानी अडथळे आणू नयेत म्हणून या खंडातील काही प्रदेशांचा ताबा युरोपीय सत्तांनी मिळविला. त्यामुळे आशिया व आफ्रिका खंडातील ते प्रदेश युरोपीय सत्तांच्या वर्चस्वाखाली आले. 


जर्मनी व इटली ही नवोदित राष्ट्रे वसाहती मिळविण्याच्या स्पर्धेत उशीरा उतरली. इंग्लंड व फ्रान्स या स्पर्धेत आघाडीवर होते. त्यांनी आशिया व आफ्रिका खंडातील संपन्न व मोक्याचे प्रदेश मिळविले होते. त्यामुळे उरलेल्या व महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रदेशांच्या प्राप्तीकरिता युरोपीय राष्ट्रातील कलह व शत्रुत्व विकोपाला गेले. साम्राज्यविस्तारांच्या या स्पर्धेमुळे निर्माण झालेल्या शत्रुत्वांचे रूपांतर महायुद्धात झाले. 


आक्रमक राष्ट्रवाद :


माझे राष्ट्र, माझ्या राष्ट्रीय परंपरा या सर्वश्रेष्ठ असून अन्य राष्ट्रे कमी दर्जाची आहेत. अशी श्रेष्ठत्वाची भावना आक्रमक राष्ट्रवाद म्हणून युरोपात विकसित झाली. आपल्या राष्ट्रावर प्रेम म्हणजे दुसऱ्या राष्ट्राचा विशेषत: शत्रू राष्ट्राचा द्वेष ही भावना दृढ झाली. पहिल्या महायुद्धापूर्वी जवळ जवळ सर्व युरोपीय देशांमध्ये अशा प्रकारची आक्रमक राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. राष्ट्रांचा प्रादेशिक विस्तार जेवढा मोठा तेवढी त्या राष्ट्राची शक्ती व प्रतिष्ठा मोठी अशी युरोपीय राष्ट्रांची समजूत झाली. युरोपातील काही बडी राष्ट्रे राष्ट्रवादाच्या नावाखाली विस्तारवादी बनली. जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया ही राष्ट्रे नवे प्रदेश हस्तगत करण्यासाठी धडपड करू लागले. आत्यंतिक राष्ट्रवादामुळे आंतरराष्ट्रीय तेढ वाढण्यास फार मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. आक्रमक राष्ट्रवादाने भरलेल्या या असंतोषामुळे आंतरराष्ट्रीय तेढ वाढण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत झाली. 


लष्करवाद :


युरोपमध्ये या काळात राष्ट्रीय शस्त्रसज्जता हाच शांतता टिकविण्याचा मार्ग आहे ही मनोवृत्ती प्रभावी ठरली. आपले प्रश्न सोडविण्याचा युद्ध हाच एकमेव मार्ग आहे अशी युरोपीय राष्ट्रांची धारणा झाली. युरोपात मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती होऊ लागली. आधुनिक शस्त्रात्रे, लढाऊ जहाजे, पाणबुड्या इत्यादींच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. ही शस्त्रसज्जता शांतता व सुरक्षिततेकरिता आहे असे प्रत्येक राष्ट्राने सांगण्यास सुरुवात केली. प्रत्येक राष्ट्र आपल्या लष्करी सामर्थ्याविषयी गुप्तता पाळू लागली. अशा प्रकारे युरोपातील राजकारण लष्करी डावपेचामुळे स्फोटक बनले. 


राजनैतिक गटबाजी :


युरोपीय राजकारणात राजनैतिक गटबाजीची सुरुवात प्रशियाचा चॅन्सेलर बिस्मार्क याने केली. मध्य युरोपातील सर्व जर्मन वंशाच्या राज्यांचे प्रशियाच्या नेतृत्वाखाली एकीकरण करावे अशी त्याची महत्त्वकांक्षा होती. प्रशियाला सामर्थ्यसंपन्न बनविण्यासाठी बिस्मार्कने सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. त्याच्या काळात प्रशियाने 1866 मध्ये ऑस्ट्रियाचा तर 1870 मध्ये फ्रान्सचा पराभव केला व 1871 च्या फ्रॅकफोर्टच्या तहानुसार फ्रान्सचे आल्सेस व लॉरेन हे प्रदेश बळकावले. त्यानंतरच्या काळात फ्रान्सला एकाकी पाडणे, त्याला एकही प्रबळ युरोपीय राष्ट्र मिळणार नाही याची काळजी घेणे हे बिस्मार्कच्या परराष्ट्रीय धोरणाचे प्रमुख सूत्र बनले. 


इंग्लंड व फ्रान्स यांच्यात गेल्या कित्येक शतकापासून परंपरागत वैर होते. इंग्लंड व फ्रान्स एकत्र येऊ नये याची बिस्मार्कचे दक्षता बाळगली. यासाठी बलाढ्य इंग्लंडला न दुखविण्याचे धोरण बिस्मार्कचे स्वीकारले. इटली व फ्रान्स यांच्यातील धार्मिक व वसाहतीविषयक वैमनस्याचा फायदा घेऊन बिस्मार्कने इटलीला आपल्या गटात सामील करून घेतले. 1882 मध्ये जर्मनी-ऑस्ट्रिया-इटली यांच्यात त्रिराष्ट्र मैत्री करार झाला. बिस्मार्कने गटबाजीच्या राजकारणात रशियाला पोलंड विरुद्धच्या युद्धात सहकार्य करून रशियाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. अशा रीतीने युरोपच्या राजकारणात फ्रान्सच्या एकाकी पाडण्यात बिस्मार्क यशस्वी ठरला. 


कैसर विल्यम दूसरा :


बिस्मार्कनंतर 1888 मध्ये कैसर विल्यम दूसरा जर्मनीचा सम्राट बनला. विल्यमच्या कारकिर्दीत जर्मनीची प्रचंड ओेदयोगिक प्रगती झाली. जर्मनीच्या वाढत्या उत्पादनासाठी हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता निर्माण झाली. जर्मनीला नव्या वसाहती मिळवून दयाव्यात, परदेशी व्यापार वाढवावा आणि युरोपातच नव्हे तर जगाच्या राजकारणात जर्मनीला महत्त्वाचे स्थान मिळवून द्यावे, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याच्या आक्रमक वसाहतीवादी धोरणामुळे त्याने चीन व मध्य आफ्रिकेतील काही प्रदेश मिळविले. पॅसिफिक महासागरात नाविक तळ उभारण्याच्या दृष्टीने स्पेनकडून कॅरोलीन, पालाऊ आणि मारियाना ही बेटे जर्मनीने विकत घेतली. पूर्वेकडील इंग्लंडच्या व्यापराला शह देण्यासाठी कैसर विल्यमने तुर्कस्थानकडून बर्लिन ते बगदाद व तेथून पुढे इराणच्या आखातापर्यंत रेल्वे मार्ग बांधण्याचे आधिकार मिळविले. इंग्लंड, फ्रान्स व रशिया या राष्ट्रांनी तीव्र विरोध केल्यामुळे हा रेल्वे मार्ग पूर्ण करणे त्याला शक्य झाले नाही. कैसर विल्यमने वसाहत विस्तारसाठी लष्करात व नोेदलात बरीच वाढ करून आधुनिक नाविक तळ उभारले. त्याने तयार केलेल्या कील कालव्यामुळे जर्मन युद्धनोेकांना उत्तर समुद्रात सहज प्रवेश करता आला. कैसर विल्यमच्या वसाहतवाद व आरमार वाढीबाबतच्या महत्त्वाकांक्षेतून इंग्लंड व जर्मनी या दोन राष्ट्रांमधील संघर्ष वाढत गेला. 


महायुद्धाचे तत्कालीन कारण :


28 जून 1914 रोजी बोस्नियाची राजधानी सॅराजेव्हो येथे ऑस्ट्रियाचा युवराज आर्चडयुक फ्रान्सिस फर्डिनांड याची एका जहाल सर्बियन नागरिकांने हत्या केली. हे पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण ठरले. 


महायुद्धाची वाटचाल :


ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांचे पूर्वीपासूनच वैमनस्य होते. फ्रान्सिस फर्डिनांडच्या हत्येचे निमित्त साधून सर्बियाला चिरडून टाकण्याचे ऑस्ट्रियाने ठरविले. सर्बिया विरुद्ध लढण्यासाठी जर्मनीनेऑस्ट्रियाला मदतीचे आश्वासन दिले. सर्बियाला मान्य होणार नाहीत अशा मागण्या ऑस्ट्रियाने केल्या. त्या मागण्या 48 तासात पूर्ण कराव्यात असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यावेळी रशियाने सर्बियाला मदतीचे आश्वासन दिले. रशियाच्या पाठिंब्यामुळे सर्बियाने ऑस्ट्रियाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध 28 जुलै 1914 रोजी युद्ध घोषित केले. 


ऑस्ट्रिया या युद्धात विजयी झाल्यास बाल्कन प्रदेशात ऑस्ट्रियाचा प्रभाव वाढेल याची जाणीव रशियाला होती. त्यामुळे सर्बियाच्या मदतीकरिता रशियन सेनेच्या हालचाली सुरू झाल्या. रशियाने आपल्या फोेजा मागे घ्याव्यात म्हणून जर्मनीने रशियाला बारा तासांची मुदत दिली. रशियाने हा इशारा अमान्य केल्यामुळे जर्मनीने रशियाविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यावेळी फ्रान्सने रशियाला मदतीचे आश्वासन दिल्याने जर्मनीने फ्रान्सविरुद्धही युद्ध पुकारले. त्रिराष्ट्र करारानुसार इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरणे अपेक्षित होते. मात्र इटली 1915 साली इंग्लंड व फ्रान्सच्या बाजूने युद्धात उतरला. जर्मनीने बेल्जियम व फ्रान्सवर जोरदार आक्रमण केले. या सर्व घटना घडत असताना इंग्लंड तटस्थ राहिले. शांतता टिकविण्याचा व संघर्ष टाळण्याच्या इंग्लंडचा प्रयत्न होता. परंतु जर्मनीच्या आक्रमक भूमिकेमुळे इंग्लंड युद्धात ओढले गेले . परंतु जर्मनीच्या आक्रमक भूमिकेमुळे इंग्लंड युद्धात ओढले गेले. 1917 पर्यंत रशिया दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढले.

Previous Post Next Post