अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिहा

अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिहा

प्रश्न

 अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिहा ?

उत्तर

 

 

अर्थव्यवस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत :- 

1. विशिष्ट भोेगोलिक क्षेत्र 

2. नैसर्गिक साधनसामग्री 

3. लोकसंख्या 

4. राजकीय सार्वभोेमत्व 

5. क्षेत्रिय विभाजन 


1. विशिष्ट भोेगोलिक क्षेत्र :

प्रत्येक अर्थव्यवस्थेचे सुनिश्चित असे विशिष्ट भोेगोलिक क्षेत्र असते व ते देशाच्या सीमा ठरवते. 

भारतीय अर्थव्यवस्थेचे सुमारे 32, 87, 263 चोे.कि.मी. भुक्षेत्र असून त्यात 28 राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. पृथ्वीवरील एकूण भुक्षेत्रापैकी 2.4 टक्के भुक्षेत्र भारताच्या ताब्यात आहे. 

2. नैसर्गिक साधनसामग्री  

निसर्गाकडून विनामूल्य उपलब्ध झालेली साधनसामग्री म्हणजे नैसर्गिक साधनसामग्री होय. यात भूमी, डोंगर, पाणी, सूर्यप्रकाश, समुद्र, जंगले, खनिजेसाठी इत्यादींचा समावेश होतो. 

साधनसमग्रीची उपलब्धता आणि वापर यांचा अर्थव्यवस्थेतील उत्पादन पातळीवर परिणाम होतो. 

3. लोकसंख्या 

देशातील श्रमपुरवठा लोकसंख्येच्या आकारमानावर अवलंबून असतो. शिक्षण, प्रशिक्षण आणि आरोग्यसेवा हे घटक मानवी संसाधनाची म्हणजेच उत्पादन-कार्यात वापरल्या जाणाऱ्या लोकसंख्येची गुणवत्ता सुधारतात. 

देशाच्या लोकसंख्येच्या आकारमानाशी  संबंधित तीन संकल्पना आहेत.  

अ) पर्याप्त लोकसंख्या - ही देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते. याबाबतीत उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो. 

ब) अतिरिक्त लोकसंख्या - पर्याप्त लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या होय. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीवर ताण वाढतो. 

क) न्यून लोकसंख्या - ही अशी स्थिती असते की ज्यात उपलब्ध साधनसामग्रीचा पूर्ण वापर करण्यासाठी लोकसंख्या पुरेशी नसते. 

4. राजकीय सार्वभोेमत्व 

'सार्वभोेमत्व' म्हणजे सर्वोच्च सत्ता किंवा अधिकार होय. राजकीय सार्वभोेमत्वाचा अर्थव्यवस्थेशी प्रत्यक्ष संबंध असतो. नियम तयार करणे व कायद्याची अंमलबजावणी करणे यासाठी सरकारला सर्वोच्च अधिकार असणे आवश्यक आहे. स्वतंत्र व राजकीयदृष्टया सार्वभोेम राष्ट्र देशाच्या सामाजिक व आर्थिक कल्याणसंबंधी निर्णय घेऊ शकते. 

5. क्षेत्रीय विभाजन 

मालकी (स्वामित्व) आणि व्यवस्थापनाच्या आधारे क्षेत्रांचे खासगी क्षेत्र, सरकारी क्षेत्र व संयुक्त क्षेत्र असे वर्गीकरण केले जाते. 

उपक्रमांच्या स्वरूपानुसार विविध उत्पादन उपक्रमांचे मुख्यत: अर्थव्यवस्थेच्या तीन क्षेत्रात वर्गीकरण केले जाते. 

अ) प्राथमिक क्षेत्र - याला कृषि क्षेत्र असेही म्हणतात. मुख्यत: नैसर्गिक साधनसामग्रीवर आधारित व्यवसायांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात केला जातो. उदा. शेती आणि पशुपालन, कुक्कुपालन, मत्स्यव्यवसाय, जंगल व्यवसाय, खणकाम यासारखे उपक्रम. 

भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत निम्यापेक्षा अधिक लोकसंख्या प्राथमिक क्षेत्राशी संलग्न असते. 

ब) द्वितीय क्षेत्र - याला ओेदयोगिक क्षेत्र असेही म्हणतात. यामध्ये कारखानदारी, बांधकाम, वीज, नैसर्गिक वायू, पाणी पुरवठा इत्यादींशी संबंधित व्यवसायांचा समावेश होतो. 

क) तृतीय क्षेत्र - याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात. यामध्य वाहतुक, दळणवळण, बँका, विमाव्यवसाय, व्यापार, वित्त (फायनान्स), आरोग्य, शिक्षण, उपहारगृह, मनोरंजन यासारख्या सेवांचा समावेश होतो. 

'स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे क्षेत्रीय विभाजन' हा देशाच्या आर्थिक विकासाचे मापन करण्याचा एक निर्देशांक आहे. 

भारतात, स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय व तृतीय क्षेत्राचे योगदान वाढत आहे. भारताच्या आर्थिक विकासात वाढ होत आहे असे ते दर्शवते. 



Previous Post Next Post