आर्तव चक्र म्हणजे काय? आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा.
उत्तर :
यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसाच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र असे म्हणतात.
i) आर्तव चक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून चार संप्रेरकांद्वारे तिचे नियंत्रण होते. पुटीका ग्रंथी संप्रेरक, ल्युटीनायझींग संप्रेरक, इस्ट्रोजेन संप्रेरक व प्रोजेस्टेरॉन संप्रेरक ही चार संप्रेरके होत.
ii) पुटीका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटीकांपैकी एका पुटीकेसह त्यातील अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटीका 'इस्ट्रोजेन' संप्रेरक स्त्रवते.
iii) इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते.
iv) दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते.
v) पितपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यांतील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन म्हणतात.
vi) अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड तयार होते. हे पितपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते.
vii) प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते व अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते.
viii) अडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्रवणे पूर्णपणे थांबते.
ix) या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतःस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. या बरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव पाच दिवस सुरू राहतो. यालाच मासिक पाळी किंवा ऋतुस्त्राव म्हणतात.
आर्तवचक्र/ ऋतुचक्र |