टिपा लिहा जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
उत्तर :
पीक जैवतंत्रज्ञान : कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो.
संकरित बियाणे : दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके : बाहेरच्या जनुकाला एखादया पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात.
बीटी कापूस : बॅसिलस थुरीनजाएनसीस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. बोंड अळीने कापसाची पाने खाल्ली तर हे विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते.
बीटी वांगे : बॅसिलस थुरीनजाएनसीस या जीवाणूंपासून मिळवलेले जनुक वापरुन बी.टी. बांगे तयार केले जाते. बी.टी. कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण कीडीचा नाश करते.
गोल्डन राईस : तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्त्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस - 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटिन सापडते.
तणनाशकरोधी वनस्पती : तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकांवर होतो. त्यामुळे तणनाशकरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहेत. यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचे नियंत्रण सहज शक्य आहे.
जैविक खते : रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळवण्याची क्षमत वाढते. यामध्ये प्रामुख्याने ऱ्हायझोबिअम, अझोटोबॅक्टर, नोस्टॉक, अँनाबीना या जीवाणूंचा तसेच अझोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो.