पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा

पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा

प्रश्न

 पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा

उत्तर

 

 

i) स्थायू पदार्थास उष्णता दिल्यास सुरुवातीस त्याचे तापमान वाढते. या वेळी पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थाच्या कणांची (अणू, रेणू इत्यादी) गतिज ऊर्जा वाढवण्यात, तसेच त्या कणांमधील आकर्षण बलांविरुद्ध कार्य करण्यात म्हणजेच अणू / रेणूंमधील बंध कमकुवत करण्यासाठी वापरली जाते. उष्णता देणे सुरू ठेवल्यास ठरावीक तापमानाला (द्रवणांक) स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होऊ लागते. या वेळी तापमान स्थिर राहते व पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थातील कणांमधील बंघ तोडण्यासाठी व अवस्थांतरासाठी वापरली जाते. या उष्णतेस वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात.

ii) द्रवाचे द्रवाच्या उत्कलनांकावर वायूमध्ये रूपांतर होतानाही उष्णता शोषली जाते, पण तापमान बदलत नाही. या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात. या वेळी शोषलेल्या उष्णतेचा वापर द्रवाच्या कणांमधील बंध कमकुवत करण्यासाठी अवस्थांतरासाठी होतो.

iii) काही पदार्थाच्या बाबतीत ठरावीक भौतिक स्थिती असताना स्थायूचे बाष्पात रूपांतर होऊ शकते. या वेळीही उष्णता शोषली जाते, पण तापमान स्थिर राहते. या उष्णतेस संप्लवनाचा अप्रकट उष्मा म्हणतात.

iv) अप्रकट उष्मा म्हणजे पदार्थाचे स्थिर तापमानास अवस्थांतर होत असताना पदार्थाचे शोषून घेतलेली अथवा बाहेर टाकलेली उष्णता होय. द्रवाचे स्थायूत रूपांतर होताना, बाष्पाचे द्रवात रूपांतर होताना, तसेच बाष्पाचे स्थायूत रूपांतर होताना हा अप्रकट उष्मा पदार्थाकडून बाहेर टाकला जातो.

Previous Post Next Post